खुदीको कर बुलंद इतना…
#Guftagu

खुदीको कर बुलंद इतना

खुदीको कर बुलंद इतना

आज शालिनी तपासायला आली आणि आल्यावर तिने नेहमीप्रमाणे हसून मला नमस्कार केला. काही पेशंट्सच्या हसण्यानेच आपल्याला प्रसन्न वाटत, शालिनी ही त्यातलीच एक. ती तपासून गेली आणि मी भूतकाळात शिरलो…. पाच वर्षपूर्वीचा प्रसंग मला जसाच्या तसा आठवत होता.

अस्थिरोगतज्ञ डॉ. बाभुळकरांच्या दवाखान्यात शालिनी अ‍ॅडमिट होती आणि वेदनेनी कळवळत होती. तिचा मोठा अपघात झालेला होता. नुकतीच लग्न झालेली शालिनी चार महिन्यांची गरोदर होती. अशा आनंदाच्या क्षणी अचानक तिच्यावर हा आघात झाला होता. केवळ नशबी बलवत्तर म्हणूनच तिचा जीव वाचला होता.डॉक्टरांनी आपले कौशल्य पणाला लावले. तिच्यावर जवळपास नऊ शस्त्रक्रिया करून तिला त्यांनी जीवनदान दिले. परंतु गोष्ट इथेच संपणारी नव्हती. या अपघातात तिला तिचा उजवा पाय पूर्णपणे (म्हणजे अगदी मांडीच्या वरच्या भागापासून) गमवावा लागला. स्त्री रोगतज्ज्ञ या नात्याने मी जेव्हा तिला तपासले तेव्हा आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इतके सारे ऑपरेशन्स आणि औषधं यामुळे तिच्या बाळाला व्यंग झाले होते.

तरीपण अशावेळी आर्इच्या तब्येतीला प्राधान्य देऊन डॉक्टरांनी तिचा उपचार सुरूच ठेवला. तिच्या नवर्‍याला आम्ही हे कटू सत्य सांगितले. पंधरा दिवसानंतर तिची तब्येत थोडी सुधारल्यावर तिला आणखी एका दिव्याला सामोरे जावे लागले . पाच महिन्याच्या गर्भाचे अ‍ॅबॉर्शन. हे अ‍ॅबॉर्शन अतिशय त्रासाचे, अगदी धडधाकट. स्त्रियांच्या देखील तोंडचे पाणी पळवणारे आणि हिची अवस्था तर आधीच इतकी वार्इट. त्या दिवशी तिच्या उपचाराच्या वेळी आमचे संपूर्ण हॉस्पिटल हादरले होते. तिच्या वेदना सगळया स्टाफला जाणवत होत्या. सगळयांचेच डोळे पाणावले होते.अ‍ॅबॉर्शन व्यवस्थित पार पडले. तिला सुट्टी झाली आणि आम्ही तो किस्सा विसरलो देखील. त्यावेळी एक गोष्ट मी प्रकर्षाने अनुभवली. ती ही की या संपूर्ण प्रसंगात तिचा नवरा आणि सासरची मंडळी सदैव तिच्या सोबत असायची, तिला धीर द्यायची.

आणि आठ महिन्यानंतर….
मी तर तिला ओळखलंच नाही. ती चक्क दोन पायांवर चालत माझ्या दवाखान्यात आली. तिच्याकडे पाहून कोणी विश्वास देखील ठेऊ शकत नव्हता की हीच ती शालिनी. डॉक्टर, पाळी चुकली आहे, ती म्हणाली. तिला दिवस गेले होते. तिच्या नवर्‍याने, प्रभाकरने, यथावकाश मला या आठ महिन्यांमध्ये जयपूर फुटच्या सहाय्याने. ती कशी जिद्दीने चालायला लागली याचा किस्सा सुनावला. तिच्यातील हिम्मत पाहून तर आम्ही स्तंभितच झालो. पुढे नऊ महिन्यांमध्ये तिला छोटे-मोठे बरेच अडथळे आले. जसे, त्या जयपूर फुटचा बेल्ट पोटावर नीट बसायचा नाही त्यामुळे त्रास व्हायचा. चालतांना पाय दुखायचा, हे असले अडथळे तिने हसत खेळत पार केले.

प्रसूतीची वेळ जवळ आली तशी आणखी एक काळजी आम्हास सतावू लागली. ती पोरगी एका पायाच्या भरवशावर प्रसूतीच्या कळा कशा काय घेणार? त्यासाठी तिला आम्ही तयार केलं. कळा सुरू झाल्यावर मी तिला विचारलं, काय शालिनी, नॉर्मल डिलेव्हरी करायची आहे ना? ती नेहमीप्रमाणे हसत एका पायावर (हो खरोखरच एका पायावर) तयार! तिचे बाळंतपण व्यवस्थित पार पडले आणि ते पण नॉर्मल. आजच्या काळात प्रसूतीच्या कळांचा त्रास नको म्हणून सिझेरियनच करा असा आग्रह धरणार्‍या बर्‍याच स्त्रिया असतात. या पार्श्वभ्ाूमीवर शालिनीच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल.

आज शालिनी दोन मुलांची आर्इ आहे, तोच हसरा चेहरा, तोच काळजी घेणारा नवरा. सर्वकाही तसंच आहे. पाच वर्षापूर्वीसारखंच. फक्त भर पडली आहे ती दोन हसर्‍या, गोंडस पिल्लांची.
आजही शालिनीचा विचार मनात आला की अल्लामा इकबाल यांचा प्रसिध्द शेर आठवतो.

खुदीको कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले,
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है।

शालिनी प्रभाकर हाडगे हे तिचे पूर्ण नाव. शालिनी व प्रभाकर यांची परवानगी घेऊन ही सत्य घटना प्रकाशित करीत आहोत.

डॉ. चैतन्य शेंबेकर
चेअरमेन अँड मॅनेजिंग डायरेक्टर
ओमेगा हॉस्पिटल, नागपूर