टेस्ट ट्युब बेबीचा रंजक इतिहास

टेस्ट ट्युब बेबी

टेस्ट ट्युब बेबी हे नाव आज घराघरात झाले आहे. टेस्ट ट्युब ने मूल झाल्याच आपण बरेचदा ऐकतो. जगाच्या पाठिवर जवळपास २० लाख मुले या आधुनिक तंत्रज्ञानाच्यामुळे जन्माला आली आहेत. तर अशा या टेस्ट ट्युब बेबीचा इतिहास अतिशय रंजक आहे. अशा पद्धतीने मूल होणं हा काही योगायोग नव्हे आणी चमत्कारही नव्हे. तर त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि तपस्या आहे. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अशी भावना होती की, स्त्री आणि पुरुष दोघेही विर्य निर्माण करतात. आणि या विर्यांच्या मिलनातून गर्भाची निर्मिती होते. त्यानंतरच्या शतकात अँरिस्टॉटल ने प्रथम हा शोध लावला की स्त्रीच्या शरीरात स्त्रीबीज ग्रंथी असते. हे स्त्रीबीज व पुरुषांचे शुक्राणू यांच्यापासून मूल होते.

त्यानंतर अनेक वर्षानंतर १७८६ मध्ये जॉन हंटर या गृहस्थाने एक प्रयोग करून पाहिला. तो उपचार करीत असलेल्या एका पुरुषाला जन्मतः असलेल्या व्यंगामुळे शारिरीक संबंध अशक्य होते. अशा पुरुषाचे वीर्य त्याने एका नळीच्या साहाय्याने त्याच्या पत्नीच्या गर्भाशयात सोडले आणि त्यामुळे स्त्रीला गर्भधारणा झाली. याला म्हणतात इंद्रायुटेराईन इनसेमिनेशन (IUI). अनेक शास्त्रज्ञांनी सतत या विषयावर संशोधन सुरु ठेवले. त्यानंतर अलिकडच्या काळात, म्हणजे विसाव्या शतकाच्या मधल्या काळात, अनेक शास्त्रज्ञ प्राण्यांवर संशोधन करीत होते. त्यांचा प्रयत्न स्त्रीबीज आणि शुक्राणूंच्या मिलनातून प्रयोगशाळेत गर्भनिर्माण करणे हा होता.

इ.स. १९५४ मध्ये थीबॉल्ट नावाच्या शास्त्रज्ञाला सश्यांमध्ये अशाप्रकारे गर्भनिर्मीती करण्यात यश प्राप्त झाले. आणि १९५९ मध्ये या प्रक्रियेद्वारे नवीन जीव जन्माला आला. याच सुमारास स्त्री रोगतज्ञांनी देखील या विषयांत अभ्यास करायला सुरुवात केली. १९५९ साली न्युयॉर्क शहरात झालेल्या जागतिक परिषदेत हा विषय चर्चिला गेला. आणी या सर्व घडामोडी होत असतांना एक ध्येयवेडा व्यक्ती होता. ज्याने मानव जातीत अशा प्रकारे गर्भ निर्मिती करण्याचा विडा उचलला होता. त्याने स्वतःच्या प्रयोगशाळेत उंदरांवर हा प्रयोग यशस्वी केला होता. आणि त्याचा या विषयावरील अभ्यास दांडगा होता. त्या व्यक्तीच नाव होतं रॉबर्ट एडवर्ड.

एडवर्ड ने ‘उदरांवरील प्रजनन’ या विषयावर पीएच. डी. केली होती आणि प्रचंड मेहनत, अतिशय शिस्तबद्ध कार्य. आणि सखोल अभ्यास या गुणांच्या आधारे तो अशक्य गोष्टीला शक्य करायला निघाला होता. त्याचे ध्येय होते मनुष्यांमध्ये प्रयोगशाळेत गर्भ निर्माण करणे. आणि अमेरिकेतील बाल्टीमोरच्या सुप्रसिद्ध जॉन हॉपकीन्स इन्स्टीटयुट मध्ये बॅरी बॅवीस्टर. या त्याच्या पीएच. डी च्या विद्यार्थ्याबरोबर संशोधन करुन १९६९ साली स्त्रीबीजाला गर्भामध्ये रुपांतर करण्यात तो यशस्वी झाला.

या दरम्यान अनेक परिषदांमध्ये तो इतर डॉक्टरांच्या भेटी घेत होता. विषयावरील त्याच्या संशोधनाबद्दल भरभरुन बोलत होता. या दरम्यान त्याने अनेक स्त्री रोगतज्ञांशी गाठी भेटी घेतल्या. आणि आपल्या संशोधनाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल याचा विचार केला. परंतु त्याच्या पदरी निराशाच आली. काही लोकांनी त्याच्या संशोधनाचा उपहास केला तर काहींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. या दरम्यान अगदी योगायोगानेच लंडन येथील एका परिषदेमध्ये त्याची गाठ पडली पॅट्रीक स्टेप्टो नावाच्या स्त्रीरोगतज्ञाशी. हा उत्साही स्त्रीरोगतज्ञ त्यावेळी ओल्डहम नावाच्या एका छोट्या गावात काम करीत होता. तो लॅप्रोस्कोपीच्या शास्त्रक्रीयेमध्ये तज्ञ होता. आणि  लॅप्रोस्कोपीच्या साहाय्याने स्त्रीबीजग्रंथीतून स्त्रीबीज काढून देण्यास तो एका पायावर तयार झाला.

आणि त्या दिवशी एडवर्ड आणि स्टेप्टो या दोघांनाही कल्पना नव्हती की त्यांची ही जोडी इतिहास घडविणार होती. काळ होता १९७१ चा एडवर्ड केंब्रीजमध्ये काम करायला लागला. केवळ या कामाकरीता तो अमेरिकेहून इंग्लंडला स्थायीक झाला. परंतू केंब्रीज ते ओल्डहम हे १८० मैलाच अंतर त्या दोघांनाही पार कराव लागत असे. ते दिवस अतिशय कठीण होते. या जोडीच संशोधन कार्य सुरु होतं. जवळजवळ  चार वर्षानंतर १९७५ मध्ये त्यांना पहीली गर्भधारणा मिळण्यात यश प्राप्त झालं. पण म्हणतात ना नशिबाची साथ आणि देवाचे आशिर्वाद असल्याशिवाय काहीही शक्य नसते. नेमकं तसंच त्यांच्याबाबतीत घडत होते. ही गर्भधारणा गर्भनलिकेत राहीली आणि शेवटी निराशाच पदरी पडली.

त्यानंतर या दोघांनी सतत ३२ स्त्रीयांमध्ये गर्भाचे प्रत्यार्पण करुन पाहिलं परंतु यश मिळाले नाही. उलट इंग्लंडमधील अनेक प्राख्यात स्त्री रोग तज्ञ त्यांच्यावर आरोप करु लागलेत. परंतु आपल्या निश्चयापासून जराही न डगमगता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले. २५ जुले १९७८ हा दिवस स्त्री रोगतज्ञांच्या आणि ओघाने सर्व जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. एडवर्ड आणि स्टेप्टो यांच्याकरीता हा भाग्याचा आणि सोनियाचा क्षण होता. लुईस ब्राऊन नावाच्या सुंदर नाजूक आणि गोंडस मुलीचा या दिवशी जन्म झाला. आणि ही लेक टेस्ट ट्युब बेबी ची जगाला दिलेली प्रथम भेट ठरली.

आज या घटनेला ४२ वर्षापेक्षा अधिक काळ उलटला. या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या. अनेक नवीन संशोधन झालीत आणि टेस्टट्युब बेबी ची प्रक्रीया जगमान्य झाली. अनेक निपुत्रीकांना याद्वारे पुत्रप्राप्ती झाली आणि अनेकांचे अश्रू यामुळे पुसल्या गेले.

— २००८ मध्ये याच लुईस ब्राऊनला कन्यारत्न प्राप्त झाले. टेस्ट ट्युब बेबी ने झालेली मुलगी आज आई  झाली आहे. आणि या निमित्ताने एक प्रकारे टेस्टट्युब बेबीच्या उपचारावर शिक्कामोर्तब झाले.

— २०१० साली एडवर्ड यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. आणि एडवर्ड यांना त्यांच्या संशोधनाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

 

डॉ. चैतन्य शेंबेकर
चेअरमेन अँड मॅनेजिंग डायरेक्टर
ओमेगा हॉस्पिटल, नागपूर