सेकंड इनिंग्स

 

सेकंड इनिंग्स

सेकंड इनिंग्स

कोरोना चा प्रभाव मानसिक स्वास्थावर देखील होतो आहे. या काळात विशेषतः मेनोपॉज च्या वयोगटातील स्त्रीयांना काळजी घ्यायला हवी.

“आई, तू पूर्वीसारखी राहिली नाहीस?, रिटा चिडूनच आईला म्हणाली.

“छोटया छोटया कारणांवरून रागावतेस काय?

ऑफिसची पार्टी आहे म्हटलं की घाबरतेस काय?

अर्चना विचार करू लागली. परवा हेमंत पण मला असच काही म्हणत होता….

काय कारण असावे बरे?

स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात. परंतु या बदललेल्या स्वभावाला मात्र औषध आहे. वयाच्या ४५ वर्षाच्या आसपासचा काळ हा मेनोपॉजचा (सेकंड इनिंग्स) काळ असतो, त्याचा उपचार होऊ शकतो.

हेया काळात वय वाढत असण्याची जाणीव, मोठी झालेली. व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले (एम्प्टी नेस्ट सिंड्रोम) .आपल्या वाढलेल्या व्यापात गर्क असणारा नवरा. सर्वात महत्वाचे म्हणजे मेनोपॉज व त्या अनुषंगाने होणारा शरीरातील हार्मोन्सचा बदल. यानंतर सगळया गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो.

मेनोपॉज म्हणजे पाळी थांबणे – रजोनिवृत्ती.

आता बहुतांश स्त्रिया हया नोकरी करणाऱ्या असतात. अशावेळी घरची जबाबदारी, ऑफिसचे वाढते काम या दोन्ही गोष्टींमुळे हा प्रश्न अधिकच बिकट होऊन जातो. आजकाल राजेनिवृत्तीमध्ये घेण्याची औषधे (हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी) याला याचमुळे अधिक महत्व येऊ लागले आहे.

पण ही सर्व प्रक्रिया अचानक होत नाही. तर ती जवळपास ५ वर्षात म्हणजे वयाच्या ४५ व्या वर्षापासून ते ५० व्या वर्षापर्यंत पूर्ण होते.

रजोनिवृत्ती (मेनोपॉज) चे महत्व दिवसेंदिवस वाढण्याचे कारण काय?

जुन्या बायका म्हणतील आमच्यावेळी नव्हतं बाई असं काही. हल्ली तर सगळया गोष्टीचं फॅडच झालं आहे.

कारण आहे वाढलेले आयुष्यमान.

स्त्रीचे आयुष्यमान ८० वर्षापर्यंत वाढलेले आहे. स्वाभाविक प्रत्येक स्त्री ही आयुष्यातील १/३ भाग हा रजोनिवृत्तीच्या कालखंडात घालवीत असते. पाठोपाठ त्यामुळे त्याच्या अनुषंगाने होणारे आजार व त्याचा उपचार याचे महत्व फार फार वाढलेले आहे.

हा त्रास ढोबळपणे ३भागात विभागला जाऊ शकतो.

अ) लगेच होणारा त्रास हा काही महिने ते काही वर्ष चालतो व २-३ वर्षात तो हळूहळू कमी होतो. त्यामध्ये….

* पाळी अनियमित होणे.

*  जास्त किंवा कमी पाळी जाणे.

* कानावाटे गरम वाफा जाणे. उष्ण अशा वाफा सुरूवातीला कानावाटे व मग चेहऱ्यावर, मानेवर व छातीवर देखील जाणवायला लागतात. हे त्रास काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत राहतो. दिवसातून खूपवेळा हा त्रास होऊ शकतो.

* रात्रीच्या वेळी खूप घाम येणे.

* झोप न लागणे – त्यामुळे थकवा, चिडचिड, भीती वाटणे, आत्मविश्‍वास नसणे, विसरभोळेपणा इत्यादी प्रकारही होतात.

ब) काही काळानंतर होणारा त्रास – यामध्ये लघवीमध्ये जळजळ, सारखी लघवी लागणे, हसल्याने किंवा खोकल्या केल्याने लघवी होणे, संबंधाच्यावेळी त्रास होणे, हात, पाय, सांधे, कंबर दुखणे, सुरकुत्या येणे इत्यादी प्रकार मोडतात.

जसजसे वय वाढते तसतसा हा त्रास अधिकच वाढत जातो. त्यामुळे स्त्रिया समारंभात किंवा बाहेर जाणे टाळतात व आत्मविश्‍वास गमावून बसतात.

क) बऱ्याच वर्षानंतर होणारा त्रास – हाड ठिसूळ होणे व हृदयरोगाचे प्रमाण वाढणे या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी उशीराच लक्षात येतात.

मेनोपॉज मुळे शरीरातील हाडांचे सर्वात जास्त नुकसान होते. भारतातील 3 पैकी एका स्त्रीला याचा त्रास होतो यामध्ये प्रतिबंधात्मक उपायाला अधिक महत्व आहे. आज गरज आहे आपल्या लाईफ स्टाईल मध्ये बदल आणण्याची. आपण खरोखरचं स्टाईलमध्ये जगतो पण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मनात येईल तेव्हा आम्ही गोड खातो. वाटेल तेव्हा हॉटेलात जातो. नुसतं खाणं कमी करून चालणार नाही तर त्याला व्यायामाची देखील जोड हवी. आहार आणि व्यायामाबरोबरच औषधांची देखील गरज आहे. निरनिराळया प्रकारची औषध बाजारात उपलब्ध आहेत. जसे गोळया, क्रीम्स, इंजेक्शन इत्यादी. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे औषधे घ्यायला हवीत.

सुरूवातीच्या काळात होणारा त्रास जर खूप जास्त असेल तर मेनोपॉजच्या आधी किंवा त्याकाळात औषध घ्यायला हरकत नाही. तसेच हृदयरोग व हाडे ठिसूळ होण्याची शक्यता असल्यामुळे देखील औषध घ्यायला पाहिजे. औषध सुरू करण्यासाठी डॉ.च्या सल्ल्यानुसार चाचण्या करून घ्यायला हव्यात. जसे, ब्लड प्रेशर, इसीजी, स्तनांची तपासणी, रक्तातील साखरेचे व कोलेस्टेरॉलचे प्रमाण, पॅप स्मिअर, सोनोग्राफी इत्यादी. आणि या चाचण्या वर्षातून एकदा करत रहाव्यात. औषधे मुख्यत्वेकरून हार्मोनल व नॉन हार्मोनल या प्रकारात मोडतात. सध्या नवीन हार्मोन्स हे अत्यंत कमी डोजमध्ये असतात. व ते विशिष्ट काळाकरीता डॉ.च्या देखरेखीखाली घ्यायला काही हरकत नसते.

नॉन हार्मोनल औषधे मुख्यत्वेकरून हाडं ठिसूळ होत असल्यास वापरल्या जातात. पण कँल्शीयमच्या गोळयासुध्दा आपल्या परीने हातभार लावतात. शिवाय या ठिकाणी आपल्या संस्कृतीचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. आपल्याकडे मेनोपॉजला स्वागतार्ह समजतात. कधी एकदा मुलाचं लग्न होते असे आपल्याकडे असतं. पाश्चात्य स्त्रिया म्हातारपणाच्या कल्पनेनीच घबरतात. म्हणून तर आपले हिंदी सिनेमावाले दाखवतात – मशीन चालवणारी म्हातारी आई, गाजराचा हलवा. आणि ती म्हणते, बेटा बस्स अब मेरी एकही तमन्ना है! तू जल्दी से शादी करले और मेरे लीये एक सुंदरसी बहू ले आ.

इंग्रजी सिनेमातली आई कदाचित म्हणते असेल रुक जा बेटा पहीले मेरी तिसरी शादी होने दे, फिर तू तेरी पहली शादी करना|

तर असा आहे फरक!

म्हटलं आहे ना…

साठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

अनुभवांच्या शिदोरीसकट बोल्डसुध्द असते.

कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती सहज Replace  करते.

डोळयातली लेन्स अन्‌ तोंडातली कवळी सहज Adjust करते.

नातवंडांबरोबर लहान होते सुनेचीही मैत्रीण होते.

संसारात राहूनही स्वत:ची स्पेस जपते.

जगायचच राहून गेलेलं ती आता जगत असते.

साठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

डॉचैतन्य शेंबेकर
चेअरमेन अँड मॅनेजिंग डायरेक्टर
ओमेगा हॉस्पिटल, नागपूर