हॅलो डॉक्टर . . .
हॅलोडॉक्टर
कोरोनाच्या काळात भारत सरकारने डॉक्टरांना टेलीमेडीसिन व व्हिडीओ कॉन्फरंसींग द्वारे रुग्णांवर
उपचार करण्यास मान्यता दिली आहे.
डॉ. चैतन्य शेंबेकर हे स्त्री रोग तज्ञ असून ते www.indiaopd.com या संकेतस्थळावर टेली
कंसल्टेशन साठी उपलब्ध आहेत.
त्या निमित्ताने डॉ. चैतन्य शेंबेकर यांचा हा लेख.
“हॅलो, कौन?”
“मी. डॉ. चैतन्य शेंबेकर.” मी शांतपणे उत्तर दिले.
“हा, जरा रूम नं. १४ से अम्मी को बुलाना, कहना बब्बू का फोन है |”
आता हा बब्बू म्हणजे कोणी ‘भाई’ ग्रुपवालाही असू शकतो., असा विचार माझ्या मनात चमकून गेला. मी
नम्र
आवाजात त्याला म्हटले—
“भाईसाहब (यातला भाई हा शब्द मी विचारपूर्वक जाणूनबुजून वापरला होता.) आपने मोबाईल फोन किया है।
मै जरा बाहर हूँ। आप हॉस्पिटल के नंबर पर फोन किजीए प्लीज|”
— तो हॉस्पिटल का नंबर तो दिजीए|”
आता माझा संयमाचा बांध सुटत चालला होता. परंतु मला चांगलं ठाऊक होतं, चिडून काहीच उपयोग नाही.
आज बब्बू तर उद्या पप्पू आपल्याला फोन करून आपल्या संयमाची परीक्षा पाहणार. मी शांतपणे त्याला
हॉस्पिटलचा नंबर सांगितला व मोबाईल बंद केला
१९९८ साली मोबाईल फोन्स बाजारात उपलब्ध झालेत आणि सुरवातीला आम्ही सगळेच आमच्या आयुष्यातील या
नव्या पाहुण्याच्या आगमनाने आनंदीत झालो. पण लवकरच या मोबाईल त्रास अनुभवास यायला लागला आणि
“असून अडचण नसून खोळंबा” चा अर्थ कळायला लागला.
सुरवातीला या व अशा प्रकारच्या असंख्य फोन कॉल्सला मला सामोरे जावे लागत असे. आणि हे शब्दांचे
मार हसतखेळत सहन करावे लागत असत.
एकदा तर गंमतच झाली. सायंकाळी सातसाडेसातच्या सुमारास ओपीडीमध्ये गर्दी असताना ‘रामाकोना’ या
गावाहून
मला ‘मोबाईल’ आला. समोरची व्यक्ती माझा जवळचा मित्र असल्यासारखी बोलत होती. म्हणाली, “
हॅलोडॉक्टर, माझ्या पत्नीला
हॅलोडॉक्टर, तुम्हाला दाखवायचं आहे. उद्या सकाळी सहाच्या बसने आम्ही रामाकोन्याहून निघतो आहोत.
दुपारपर्यंत पोहोचू. तुम्ही
आहात ना?” .
“हां-मै हूँ ना”- मी ‘शाहरूख’ स्टाईल उत्तरलो.
“ठीक, तर डॉक्टर उद्या भेटू” इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण सकाळी पावणेसहाला मी साखरझोपेत असताना
पुन्हा
मोबाईल खणखणला. पलीकडचा आवाज रामाकोन्याहून होता-
हॅलोडॉक्टर, आम्ही निघतो आहोत.”
मी न चिडता त्याला, “ठिक आहे. या असं म्हटल. दिवसभराच्या कामात पेशंट आली नाही हे मी विसरुन
गेलो.
दुपारी जेवण आटोपून वामकुक्षी घेत असताना पुन्हा मोबाईल वाजला –
“डॉक्टर, कोराडीपर्यंत आलो आहोत. इथे हिची बहिण राहते म्हटलं थांबून जाव. आता निघतोच आहे. या
वेळी मात्र मला हसावं का रडावं हेच कळेना. आणि मग त्या प्रकरणाचा क्लायमॅक्स जवळ आला. मी रात्री
दहा वाजता घरी येऊन जेवत असताना पुन्हा त्या रामाकोनावाल्याचा फोन वाजला. तोच चिरपरिचित आवाज.
“डॉक्टर, मी सेंटर पॉईटजवळ आलो आहे.” (सेंटर पॉईटपासून
माझा दवाखाना हाकेच्या अंतरावर आहे.) आणि… मी मागचा पुढचा विचार न करता त्या न पाहिलेल्या
व्यक्तीला अद्वातद्वा बोललो आणि मोबाईल खाली पटकला.
परिणाम… ते रामाकोन्याचं जोडप सेंटर पॉईईंटजवळ आलं पण माझ्या दवाखान्यात काही आलं नाही. मी एक
पेशंट गमावला…
— आणि असले अनुभव तर हळूहळू रूटीन व्हायला लागलेत…..
डॉक्टर, वैभवीला न फार उलट्या होताहेत आणि जीवही घाबरतो आहे…”
“बरं, तू असं कर…”
माझं बोलणं मध्येच तोडत तो म्हणतो—
“थांबा थांबा डॉक्टर, वैभवीशीच बोला-
मग वैभवी पुन्हा तिला होणारा त्रास रंगवून रंगवून सांगते. मी शांतपणे ऐकून घेतो व तिला औषध
कोणतं घ्यायचं याबद्दल सांगणार तोच ती म्हणते-
“थांबा डॉक्टर, औषधाचं न ह्यांनाच सांगा – अहो, जरा औषध लिहून घ्या बरं”
मग मी वैभवीच्या ह्यांना औषध सांगणार तोच ओरडतो – ” अग ए, जरा वही आणि पेन आण बरं” वैभवी घावत
जाते. वही-पेन आणते मग तो खेकसतो –
“वैभवी पेन चालत नाही. काय है, एकसुद्धा पेन ठीक नसतो.
मग स्पेलिंग वरुन काही मिनिटे जातात व शेवटी मी सुटलो एकदाचा म्हणून मोबाईल बंद करतो व दुसरा
फोन वाजेपर्यंत समोरच्या पेशंटशी संवाद साधण्याचा प्रयत्न करु लागतो.
कधी कधी मला फोन येतो – हॅलोडॉक्टर “ डॉ. मी शिल्पा बोलतेआहे”
“कोण शिल्पा ? माझ्या आठ पेशंटचं नाव शिल्पा आहे,” असं माझ्या जिभेच्या टोकावर येते. परंतु मी
आवंढा गिळतो व “हं, बोल शिल्पा, काय म्हणतेस?” असं म्हणून बोलायला लांगतो. कारणं, मला डॉक्टर
ओळखत नाही, ही कल्पनाच शिल्पाला सहन होणं शक्य नसतं.
काही लोकांना मोबाईलवर, कुठे आहेस? काय करतो आहे? असले प्रश्न विचारण्याची सवय असते. कोणी असं
विचारलं की, मला संकोचल्यासारखं, अवघडल्यासारखं होत.
“एकदा माझ्या पेशंटचा फोन आला—
“डॉ. माझी नणंद ‘सिरियस’ झाली आहे. तिला ब्लिडींगचा खूप जास्त त्रास होतो आहे.”
“मग- तिला ताबडतोब दवाखान्यात आण.” मी उत्तरलो. “नाही डॉक्टर, तशी ती ठीक आहे. रविवारी पंचशील
टॉकीजमध्ये सिनेमा पाहायला आम्ही येणारच आहोत. म्हटलं तुम्ही भेटाल ना?” तिने लाडिकपणें
विचारले. आणि मी या अशा सिरियस’ पेशंटचं कसं करावं. या विचारांनी त्रासून गेलो.
काही अतिश्रीमंत व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मोबाईलवर सतत बोलण्याची सवय असते. असे लोक
दवाखान्यात आले
की, चेंबरच्या समोर उभे राहून फोन करतात.
“डॉक्टर, मी बाहेर उभा आहे (उंबरठ्यावर) बस्स आत येतोच आहे.”
मी बिच्चारा त्याचा स्वागतासाठी दाराशी लगबगीने उठून जातो. आणि एकदा माझ्यावर पेशंट बनण्याचा
प्रसंग आला. म्हणजे काय की, माझ्या मुलाला ताप होता व माझ्या बालरोगतज्ज्ञ असलेल्या मित्राकडे
जाणं जरुरी होत. मी अगदी सहजपणे त्याला मोबाईल केला व तो चेबंरमध्ये असल्याची खात्री करून घेतली
आणि साक्षात्कार झाला. अरे, हे असं चालायचच। डॉक्टरांसाठी जरी तुम्ही अनेक पेशंटमधले एक असलात
तरी त्या वेळी, त्या प्रसंगी डॉक्टर ही अतिशय महत्वाची व्यक्ती असते व हे आपण डॉक्टर म्हणून
समजून घ्यायलाचं हवं.
कोरोना अर्थात कोवीड-19 ने मनुष्याच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. या काळात मोबाईल आणि
इंटरनेट मुळे आपल आयुष्य बरच सुखकर झाल. मोबाईल व इंटरनेट नसते तर काय असत ? याची कल्पना देखील
करवत नाही. याच काळात आम्हा डॉक्टरांना व आमच्या रुग्णांना देखील टेलीमेडीसिन व व्हिडीओ
कंसल्टेशन च महत्व पटल. आज या सोयीमुळे रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांच्या सेवेचा लाभ घेता येतो व
अनेक प्रश्न चुटकी सरशी सोडवता येतात.
आणि आताशा या अविरत वाजणाऱ्या मोबाईलच्या घंटीची सवय व्हायला लागली आहे.
तर असं आहे मोबाईलचं आणि माझं नातं—
तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना…!
Dr. Manisha Shembekar
MD, DA
Joint Managing Director
Omega Hospital, Nagpur