मातृत्व आणि करिअर

मातृत्व आणि करिअर

मातृत्व आणि करिअर

स्त्रीच्या आयुष्यातील विविध जबाबदारार्‍या तिला यशस्वीपणे पार पाडण्यास खरी मदत मिळते. ती घरच्यांची, नवरा, मूल, सासू, सासरे, आइ-वडील यांची साथ असल्याशिवाय कुठलीही स्त्री आपलं आयुष्य व्यवस्थितपणे पूर्ण करू शकत नाही. प्रत्येक बाबतीत त्यांची साथ हीच महत्वाची ठरते. आणि आज नव्या युगाकडे वाटचाल करणार्‍या बहुतांश स्त्रियांना ही साथ मिळते आहे. ती आपल्या सर्वांच्या द़ृष्टीने अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

डॉ. चैतन्य शेंबेकर

स्त्रीरोग तज्ज्ञ या नात्याने स्त्रियांचे आरोग्य, प्रसूती व इतर आजार यांचा अभ्यास करता-करता स्त्रियांची मानसिकता. स्त्रियांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास, स्त्रियांची होणारी घालमेल या गोष्टीदेखील जवळून बघितल्या. आधुनिक काळातील स्त्रिया या द्विधा मन:स्थितीत असतात. दोन प्रश्न त्यांना सतत भेडसावत असतात.

1) स्त्रियांनी नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडावं का?
2) मातृत्व हे स्त्रियाचं करिअर होऊ शकतं का?

आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये कुठल्याही स्त्रीला कुठल्याही क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी. किंवा आपलं वर्चस्व सिध्द करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, हे खरं आहे. स्त्रीला स्वत:चा चेहरा नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. प्रसिध्द कवी प्रसन्न शेंबेकर यांनी अतिशय समर्पक असे स्त्रीच्या आयुष्याचे वर्णन केलेले आहे.

प्रश्नचिन्ह
शाळेमधल्या गमती-जमती ते शैशव कधीच सरलं
वयात आलीत बाळ आता एकदा आईनं समजावलं
मुलं आली, पाहून गेली एकदाचं मग लगीन ठरलं
मधुचंद्राची सरली वर्ष आणिक पदरात मूल आलं
दाणादाणा एक केला काडीकाडी गोळा केली
घरटं बांधलं सुबक सुंदर घरटयासाठी स्वप्नं विणली
मुलं वाढली पाहता पाहता पाखरं झाली… झेपावली दूर
दारापाशी…. उंबरठयाशी मी एकटीच उरले आतूर
नवर्‍यामागचा वाढला व्याप उसते नाही उरली काही
किडुक-मिडुक भातुकलीच्या संसारातच मी रमले बाई!
सारं काही सार्थ केलं आयुष्याचं सोनं झालं
एकदा असंच आरशामध्ये सहज डोकावून पाहिलं
आरशात दिसला नाही चेहरा मला चेहरा होता का?
आठवत नाही कित्येक वर्षा चेहरा कधी पाहिला का?
आरशात होतं प्रश्नचिन्ह आणि माझं काळीज मौन
आई…. बायको…. नात्यांपल्याड सांगू शकतेस?… तू आहेस कोण?
-प्रसन्न शेंबेकर

सुरूवातीला दोन उदाहरणे देऊन मी स्त्रियांच्या जीवनातील अस्वस्थता स्पष्ट करू इच्छितो.

नीता ही अतिशय हुशार मुलगी. दहावीला मेरिट, बारावीला चांगले गुण. इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. पुढे सर्वांची होतात तस लग्न झालं. मुलगा झाला. नवर्‍याचा व्यवसाय. गर्भारपणात नोकरी सुटली. नंतर मुलाच्या संगोपनात पुढील 20 वर्षे कशी निघ्ाून गेलीत कळलंच नाही. अतिशय हुशार असलेल्या मुलाला अमेरिकेतील कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली आणि नवरा आपल्या व्यवसायात व्यस्त. आज तिला घर खायला उठत आहे. वयाच्या 45 व्या वर्षी काही नवीन करणं शक्य नाही. आणि मग उरली आहे फक्त खंत- काहीही न केल्याची स्वत:चं अस्तित्व नसल्याची.

आता दुसरं उदाहरण
सचिन आणि सुचित्रा दोघही अतिशय हुशार. कॉलेजमध्ये असताना दोघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये दोघांचे प्रेम आणि लग्न होते. दोघही अतिशय महत्वाकांक्षी, अत्यंत हुशार. दोघही आयएएस अधिकारी होतात. मुलं नोकरांच्या भरवशावर वाढतात. कोणाला एकमेकांशी बोलायला फुरसत नाही. आणि अशा या हाय प्रोफाईल आई-वडिलांमुळे मुलं बिघडतात. ड्रग्सच्या आहारी जातात व आयुष्याच नुकसान करून घेतात. आणि आईच्या मनात उरते फक्त खंत. की मी त्यावेळी माझ्या नोकरीचा, बढतीचा, पगाराचा विचार न करता माझ्या मुलांकडे लक्ष दिल असतं तर कदाचित असं झालं नसतं.

तर विषय अतिशय महत्वाचा आहे. त्या क्षणी-तरूणपणी तुम्ही घेतलेला निर्णय, तुमचं आयुष्य बदलवू शकतो. आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा द़ृष्टिकोन आणि तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा द़ृष्टिकोन बदलवू शकतो. पूर्वी आपल्याकडे साधी सरळ पध्दत होती, पुरूषांनी अर्थार्जन करायचे व स्त्रियांनी घर चालवायचे. पुरूष बाहेरची कामे करायचा. स्त्रिया चूल आणि मूल यात स्वत:ला गुुंतवायच्या. इतकंच काय 50 वर्षापूर्वी पाश्चात्य देशांमध्ये देखील फार कमी स्त्रिया काम करायच्या.

परंतु, काळ बदलला स्त्री स्वातंष्य व स्त्रीमुक्ती आंदोलनं झाली. आंदोलन करणार्‍यांनी स्त्रियांनी घराबाहेर पडावं आणि पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं असं सुचवलं. परंतु गेल्या 10 वर्षात या भ्ाूमिकेतील अडथळे स्त्रियांच्या लक्षात यायला लागलेत. आणि बर्‍याच स्त्रिया पुन्हा मातृत्व व कुटुंब यांना महत्व देऊ लागल्या.

परवाच माझ्या हॉस्पिटलला एक आठ वर्षांची गोड मुलगी, जिचा जन्म माझ्या दवाखान्यात झाला होता. आपल्या आईसोबत आली. मी तिला विचारलं, की मोठी झाल्यावर काय करणार? माझ्यासारखी डॉक्टर होणार का?

तिने दिलेले उत्तर ऐकून मी चकित झालो.

ती म्हणाली, ‘मोठे झाल्यावर मी प्रोफेशनल डान्सर बनणार आणि लग्न करून प्रोफेशनल आई आणि प्रोफेशनल कूक बनणार.’

आजकालच्या काळात मुलींनी आपल्या आईला नोकरी करताना तिची झालेली तारेवरची कसरत पाहिली. आणि कुठेतरी त्यांच्या मनात हा विचार घर करून बसला आहे की, दोन्ही करणं शक्य नाही.

डॉक्टर या नात्याने मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अ‍ॅनाटॉमीचा वर्ग आठवतो. निसर्गाने स्त्री आणि पुरूषांच्या शरीर रचनेमध्ये फरक केलेला आहे. पुरूष शारीरिक मेहनतीचे काम अधिक योग्य प्रकारे करू शकतात. त्यांचा स्टॅमिना जास्त असता तर स्त्रिया भावनाप्रधान असतात. त्या भावनिक गुंतागुंत, नाते, संबंध अधिक प्रभावीपणे हाताळू शकतात. आता येथेच खरी गडबड होते.

स्त्रिया बाहेरची काम करू लागल्यात. त्यांची भ्ाूमिका बदलली, पंरतु त्याचा त्रास व्हायला लागला. मुलांकडे,संसाराकडे जास्त लक्ष असल्याने बरेचदा व्यवयासात किंवा कामात स्त्रियांचे लक्ष लागत नाही. म्हणजे शरीराने तुम्ही ऑफिसात असता. परंतु मनाने तुम्ही घरीच असता. त्यामुळे त्यांच्या हातून चूका होतात. बर्‍याच गोष्टी त्या विसरतात. तसंच घरी गेल्यावर शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे थकायला होतं, त्यामुळे घराकडे नीट लक्ष दिले जात नाही. सासू, सासरे, नवरा, मूलं यांच्या अपेक्षा खूप असतात व त्यांची पूर्ती करता करता जीव अर्धमेला होतो. त्यामुळे घराकडे नीट लक्ष दिले जात नाही.

त्यामुळे काम करणारी स्त्री ही कधीच खूश नसते. तिच दु:ख तिलाच माहिती असतं आणि तिच्या मनात असते सतत अपराधीपणाची भावना. असं म्हणतात की स्त्रिया मल्टीटास्किंग खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. हे खरंही आहे, परंतु आजच्या काळात माझ्या मते अनेक काम एकाच वेळी मुळीच करायला नकोत. एक ना धड भाराभार चिंध्या अशी काहीशी परिस्थिती त्याच्यामुळे होते. प्रत्येक व्यक्तीने शक्यतोवर एकावेळी एकच काम करावे आणि ते देखील मन लावून. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं.

स्त्रियांनी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडावं का?
तर या प्रश्नाच उत्तर काय?

उत्तर तुम्हालाच शोधायचे आहं, मी दोन पर्याय तुमच्यासमोर ठेवतो आहे.

1) हाऊसवाईफ टू होम मेकर – मी गृहिणी आहे आणि मी आनंदी आहे.
मला आठवतं, आमच्या लहानपणी आमची आई नेहमी म्हणायची, मी नोकरी केली असती तर संसाराला हातभार लावू शकली असती. त्यावेळी फार कमी स्त्रिया नोकरी करायच्या. पण त्यावेळी देखील तिला ती खंत होती. मग आमचे वडील म्हणायचे, तू मुलांकडे लक्ष देते, घराकडे लक्ष देते, सगळयांचं करते, मुलं चांगली हुशार निघाली. कमी पैशात तू योग्यरित्या संसार करतेस.पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमावणंच…
मला आज वडिलांचे विचार किती चांगले होते याच महत्व कळलं. कारण नेमका हाच धागा धरून भारत सरकार, घराकडे लक्ष देणार्‍या स्त्रियांना आर्थिक मदत करण्याचा विचार करते आहे. अर्थात हा मोबदला जरी फार नसला तरी हा विचार कोणी करत आहे हेही नसे थोडके! म्हणजे थोडक्यात मातृत्व हेच करिअर करायचं.

2) दुसरा पर्याय जो आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केला आणि यशस्वी झाला, तो आहे 6 तासांच्या डयुटीचा पर्याय.
26 फेब्रु. 1856 रोजी ऑस्टे्रलियामधील जेम्स गॅलोवे यांनी 8 तास काम 8 तास आराम आणि 8 तास अभ्यास. कुटुंबातील व स्वत:साठी वेळ असावा असा प्रस्ताव सरकारपुढे मांडला व त्याकरिता यशस्वी कामगार आंदोलन केले.

मी याच्याही दोन पावलं पुढे जाऊन स्त्रियांसाठी 6 तासांचेच जॉब्स तयार करावेत असं म्हणेन. आमच्या हॉस्पिटलला सर्व स्टाफ सकाळी 8 ते 2, 2 ते 8 अशा दोन शिटमघ्ये काम करतो. यामध्ये दिवसातील 18 तास तुमच्याकडे उरतात. या 6 तासाच्या कामात मात्र स्त्रियांनी पूर्ण मन लावून व व्यवस्थित काम करायला हावं. यामुळे काम दर्जेदार होईल व उत्पादकता वाढेल. कारण नोकरी किंवा काम केल्यानी अनेक चांगल्या गोष्टी हेातात. तुम्ही आर्थिकद़ृष्टया स्वावलंबी होता, तुमचं व्यवहार ज्ञान वाढतं. लोकांशी बोलायची तुम्हाला सवय होते व तुमचं समाजातील स्थान उंचावतं. मोदी सरकारने 6 महिन्यांची प्रसूती रजा मंजूर केली आहे. आता सरकारी, निमसरकारी व खाजगी संस्थांनी पुढाकार घेऊन 6 तासांच्या नोकर्‍या तयार कराव्यात. जेणेकरून त्याचा फायदा स्त्रिया घेऊ शकतील.

दुसरा मुद्दा आहे मातृत्वाचा. मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. बाळाचा जन्म म्हणजे प्रसूती, प्रसूती म्हणजे आईचा जन्म असतो. नुकत्याच झालेल्या विश्वसुंदर स्पर्धेत मानुषी छिल्लरने विश्वसुंदरीचा किताब पटकावला. तिला प्रश्न विचारला होता, की कोणत्या प्रोफेशनला सर्वात अधिक पगार दिला पाहिजे आणि का? तिच उत्तरं होत…
आई या प्रोफेशनला सर्वात जास्त पगार मिळायला हवा आणि हा पगार सन्मान, प्रेम आणि आदर या स्वरूपात असावा. मानुषी आणि प्रियंका चोप्रा या दोघींनीही मातृत्व या विषयावर उत्तर देऊन विश्वसुंदरीचा किताब पटकाविला. म्हणजे मातृत्व तुम्हाला सर्वोच्च सन्मान देऊ शकतो. इतकी ताकत त्यामध्ये आहे.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते. परंतु कुठल्याही विद्यापीठात मातृत्व या विषयावर पाठयक्रम असू शकत नाही. सकाळी 6 वा. टयुशनला जाताना आई माझे सॉक्स कुठे आहेत, म्हणून चिडणारा मुलगा याचा अनुभव फक्त आईच घेऊ शकते. आणि कुठल्याही पाठयक्रमात रात्री 2 वा. रडणार्‍या तान्हुल्याला चूप कसे करायचे या धडयाचा समावेश होऊ शकत नाही. एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार आईच्या  भ्ाूमिकेत स्त्री ज्या पध्दतीने काम करते, त्याचे पैशामध्ये मूल्यंकन झाले तर. तिला वर्षाकाठी 1 लाख 44 हजार डॉलर्स एवढा पगार मिळायला हवा. मातृत्व अनुभव ही कुठल्याही प्रकारची तडजोड नसून, एक अत्यंत आनंद देणारे काम आहे.

मातृत्व विषय चर्चिला जात असताना पालकत्वाची जबाबदारी कधी स्वीकारायची व त्यासाठी योग्य वेळ कुठली हादेखील विषय महत्वाचा आहे.

एकीकडे करियर, स्पर्धा, महत्वाकांक्षा आणि दुसरीकडे मातृत्व याचा समतोल साधणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी व्हायला हवी. उशिरा लग्न करण्याची फॅशन आज घराघरांत पोहोचली आहे. आधी करियर मग लग्न हा विचार रूढ होत चालला आहे. मग साहजिकच लग्नाला उशीर होतो. गोष्ट एवढयावरच थांबत नाही. पूर्वी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पाळणा हलायचा किंवा 7 व्या महिन्यांचे डोहाळजेवण तर नक्कीच व्हायचं. पण, आजकाल लग्नानंतर पहिली दोन ते चार वर्षे तर लोक मुलाबाळांचा विचारच करीत नाहीत. मग घरचे लोक आई-सासूबाई कुजबूज करू लागतात. आजकाल त्यांना देखील विचारायची भीती वाटते.

मग नाइलाजास्तव त्या आमच्याकडे म्हणजे डॉक्टरांकडे येतात. आम्ही विचारतो तर ते म्हणतात अजून तर आम्ही विचारच केलेला नाही. माझ्या अनुभवावरून सांगतो. पहिलं मूल स्त्रियांना 27 वर्षापर्यंत व दुसरे मूल शक्यतोवर 30 च्या आत व्हायला हवं. थोडी सवलत हवी असल्यास 30 च्या आत पहिलं व 32 च्या आत दुसरं मूलं. मी हे सांगतो आहे त्याला एक महत्वाचं कारण आहे. स्त्रीबीजं ग्रंथीचा साठा कमी होणं ही एक वैद्यकीय अवस्था आहे. याला आजार तर नाही म्हणता येणार, पण जितका उशीर तितकी ही अवस्था अधिक प्रमाणात येण्याची शक्यता असते. त्यातून अनेक समस्या उद्भवतात. आपल्या देशात हृदयरोग, मधुमेह, हाडांची ठिसूळता व इतक्यात कर्करोगाचे प्रमाण खूप वाढत आहे. त्याचबरोबर स्त्रीबीजांचा साठा कमी होण याचं प्रमाणदेखील खूप वाढल आहे.

एका अभ्यासानुसार भारतीय स्त्रियांच्या स्त्रीबीजग्रंथीचं वय हे युरोपीय स्त्रियांच्या 7 वर्षे पुढे असतं. म्हणजे 37 वर्षांची इंग्लंडमधली स्त्री आणि 30 वर्षाची भारतीय स्त्री यांच्या स्त्रीबीज ग्रंथींची काम करण्याची क्षमता सारखी असते. आणि म्हणून 30 च्या आत मूलबाळ होणं आपल्याकडे विशेष महत्वाचं ठरतं. प्रगत विज्ञानात व आमच्या टेस्टटयूब बेबीच्या क्षेत्रात याला देखील उत्तर आहे. एग फ्रिजिंग आणि एंब्रियो फ्रिजिंग म्हणजे लग्न झालं नसल्यास स्त्री बीज किंवा तयार झालेला गर्भ आम्ही फ्रीज करून ठेवू शकतो. आणि तो पुढील पाच वर्षात कधीही वापरू शकतो.

गुगल, फेसबुक, अ‍ॅपल यांच्यासारख्या कंपन्या आपल्याकडे काम करणार्‍या कामगारांना विशेषत: मुलींना फ्रिजिंग करण्यास प्रोत्साहन देत आहेत. त्यांना इन्शुरन्स आणि पैसे देत आहेत. परंतु माझ्या मते, स्वत:चे करियर करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मातृत्वाची जबाबदारी लांबणीवर टाकायची हे योग्य नाही. योग्य वेळी प्रत्येक गोष्ट होण गरजेच असतं. निसर्गाविरूध्द जाण्याला अर्थ नाही.

स्त्रीच्या आयुष्यातील विविध जबाबदार्‍या तिला यशस्वीपणे पार पाडण्यास खरी मदत मिळते. ती घरच्यांची नवरा, मूल, सासू, सासरा, आई-वडील यांची साथ असल्याशिवाय. कुठलीही स्त्री आपलं आयुष्य व्यवस्थितपणे पूर्ण करू शकत नाही. प्रत्येक बाबतीत त्यांची साथ महत्वाची ठरते. आज नव्या युगाकडे वाटचाल करणार्‍या बहुतांश स्त्रियांना ही साथ मिळते आहे. ही आपल्या सर्वाच्या द़ृष्टीने अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.